पीसीयूमध्ये देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन; भारत-कोरिया औद्योगिक संबंधांना नवी दिशा

पीसीयूमध्ये देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन; भारत-कोरिया औद्योगिक संबंधांना नवी दिशा

पिंपरी, दि. ४ जून २०२६ : पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि कोरिया एसएमइ स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’ चे उद्घाटन कोरिया प्रजासत्ताकचे महावाणिज्य दूत डोंगवान यू आणि पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डोंगवान यू यांनी सांगितले की, पीसीयूमधील कोसमे पुणे बेस कॅम्प भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरियन भाषा प्रशिक्षण, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, उत्पादन चाचणी सुविधा आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य यांसारखे विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कोसमे-पीसीयू करार हा विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीला चालना मिळेल आणि पीसीयूची वाटचाल भारतातील पहिले औद्योगिक विद्यापीठ होण्याच्या दिशेने अधिक वेगाने होईल.

कार्यक्रमास एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कोसमेचे प्रादेशिक संचालक सुसोक पार्क, कोसमे जीबीसी नवी दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक जेक्यॉन्ग ली, किटाचे मुख्य व्यापार प्रतिनिधी योंग यून, सीईपीएचे संचालक सेउंगचांग हा, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, स्टाराजीन कंपनीचे सीईओ युजिन हान यांच्यासह कोरियन उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

पीसीयूमध्ये आयोजित ‘कोरिया बिझनेस कल्चर प्रोग्राम’मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना कोरियन उद्योगसंस्कृती, कार्यपद्धती आणि जागतिक करिअरच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमामुळे कोरियन उद्योग आणि भारतातील नवोन्मेष परिसंस्था यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होऊन उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रासाठी नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.