बोरिवलीत भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय शिबिर

बोरिवलीत भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय शिबिर
बोरिवलीत भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय शिबिर
बोरिवलीत भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय शिबिर

बोरिवली पूर्व : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि बोरिवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता अभियानांतर्गत भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांसाठी विशेष शासकीय योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले. फुलपाखरू उद्यान परिसरातील विमुक्त भटके जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेच्या कार्यालयात सोमवारी हे शिबिर पार पडले.

मुंबई प्रतिनिधी : सौ. रूपाली मनोज बैसाने

शिबिरात जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना आणि उत्पन्न दाखल्यासाठी नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. जात प्रमाणपत्रासाठी ५९, अधिवास प्रमाणपत्रासाठी ३२, आधारकार्डसाठी ६३, शिधापत्रिकेसाठी २६, आयुष्मान भारत कार्डसाठी ३५, संजय गांधी निराधार योजनेसाठी २२ आणि उत्पन्न दाखल्यासाठी २० अर्ज प्राप्त झाले. दोनशेपेक्षा अधिक नागरिकांनी विविध शासकीय योजना आणि सुविधांची माहिती घेतली.

शिबिराची वेळ दुपारी दोन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिबिराचे कामकाज सुरू ठेवले.

यावेळी भटके-विमुक्त जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकुमार शिंदे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सहदेव रसाळ, भाजपा उत्तर मुंबई सरचिटणीस रामकृष्ण बेलवलकर, भाजपा भटके-विमुक्त मोर्चा मुंबई अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांच्यासह बबन मोहिते, अनघा चांगले, अर्चना लष्कर आणि शोभा माने उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांमध्ये दर तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी अशा प्रकारची शासकीय शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.