भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा
भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

मुंबई, दि. १३ : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेतील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते. उद्योजक रमेश दंडवते यांनी संस्थेच्या बळकटीकरणासाठी ५० लाख रुपयांची मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे भारतीय दृष्टिकोनातून पुनर्मूल्यांकन होणे आवश्यक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच देशातील ग्रंथालये आणि संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे, असे त्यांनी नमूद केले.

ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत तसेच विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन आणि संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सोसायटीच्या कार्याला राज्य शासनाचे सहकार्य

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे त्यांनी सांगितले.

नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथसंपदेच्या नाशाच्या घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या ज्ञानपरंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

नव्या कार्यकारिणीच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली आहे. सोसायटीच्या ग्रंथालय विभागाच्या मुख्य कार्यालयासाठी नवीन जागा तयार झाली असून कार्यालय लवकर सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल. अभ्यासकांना ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले.

एशियाटिकच्या वारशासाठी सर्वतोपरी मदत

एकनाथ शिंदे यांची ग्वाही

एशियाटिक सोसायटीचा २२२ वर्षांचा गौरवशाली वारसा असून प्राचीन ग्रंथ, पांडुलिपी आणि नाण्यांचे जतन भावी पिढ्यांसाठी आवश्यक आहे. या वारशाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे १३०० दुर्मीळ सुवर्ण, रजत, कांस्य आणि तांब्याची ऐतिहासिक नाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.

भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा, बोधिसत्त्वाचे अवशेष, १७८८ मधील मुघलकालीन हिंदुस्तानाचा नकाशा आणि १८७० मधील नर्मदा नदीचा नकाशा हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. भारतीय राजे व जमीनदारांच्या शाही दरबाराचा अल्बम, दुर्मीळ ऐतिहासिक ग्रंथ तसेच कोल्हापूर आणि कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तूही प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. सचिव विवेक गणपुले यांनी आभार मानले.