भिवंडीत धार्मिक नेत्यांची आरोग्य जनजागृती बैठक

भिवंडीत धार्मिक नेत्यांची आरोग्य जनजागृती बैठक
भिवंडीत धार्मिक नेत्यांची आरोग्य जनजागृती बैठक

भिवंडी, ९ सप्टेंबर : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक नेत्यांची विशेष बैठक घेऊन नियमित लसीकरण, गृहप्रसूती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.

महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीला मुस्लिम समाजातील उलेमा, हिंदू धर्मातील पंडित, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

लहान मुलांचे नियमित लसीकरण वाढविण्यासाठी धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली. काही इमारतींमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश न मिळाल्याने लसीकरणाची माहिती मिळण्यात येणाऱ्या अडचणींवरही विचारविनिमय करण्यात आला.

गृहप्रसूतीमुळे माता आणि नवजात बाळाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वच्छतेबाबत आयुक्त अनमोल सागर यांनी नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा तसेच घरासोबत परिसरही स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. स्वच्छता ही केवळ महापालिकेची नव्हे तर सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर आणि टीबी विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांच्या आयोजनाने झालेली बैठक सकारात्मक चर्चेनंतर संपन्न झाली.