महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, रेल्वे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल व पोलीस प्रशासन तसेच समाजकल्याण विभागाचे सचिव बागुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, अमित तांबे, रमेश गायकवाड, चंद्रशेखर कांबळे, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे प्रमुख नागसेन कांबळे, पूज्य भदंत राहुल महाथेरो, कुणाल कांबळे, अभया सोनवणे, उषाताई रामलू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षी ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे श्रद्धेने साजरा केला जातो. यावेळी देशभरातून लाखो भीम अनुयायी अभिवादनासाठी येतात. यंदा ६ डिसेंबर २०२६ रोजी रविवार असल्याने अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, रेल्वे आणि राज्य शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून अनुयायांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश ना. रामदास आठवले यांनी दिले.
रविवार असल्याने रेल्वे प्रशासनाने त्या दिवशी मेगाब्लॉक घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावावेत आणि पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
बार्टी, समाजकल्याण विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भीम अनुयायांसाठी भोजन व्यवस्था करण्यात यावी. तसेच बेस्ट उपक्रमातर्फे १ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील भीम स्मारकांना भेट देण्यासाठी अनुयायांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना ना. आठवले यांनी केली.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी मुंबई महानगरपालिकेने किमान २० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना केली. गेल्या वर्षी या कामांसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा वाढती गर्दी आणि आवश्यक सुविधांचा विचार करून २० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली. महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले.
६ डिसेंबर रोजी मुंबईत राज्य शासनाच्या वतीने ड्राय डे जाहीर करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली. स्वच्छता, सुरक्षा, अन्नदान आणि इतर आवश्यक व्यवस्थांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्सना परवानग्या सुलभतेने देण्यात याव्यात; मात्र महापरिनिर्वाण दिनाच्या सभेच्या परिसरात स्टॉल्समुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता पोलीस आणि प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश ना. आठवले यांनी दिले.
चैत्यभूमीसमोरील सेल्फी पॉइंटपासून इंदू मिलपर्यंत समुद्रात भराव टाकून संविधान पथ तयार करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. या कामासाठी आवश्यक असलेली सीआरझेडची परवानगी लवकरात लवकर मिळविण्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चैत्यभूमीवरील स्तूपाची अवस्था जीर्ण झाली असून त्याचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीप्रमाणे चैत्यभूमी येथेही भव्य स्तूप उभारण्यात यावा. यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी ना. आठवले यांनी केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या राष्ट्रीय स्मारकाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केली. राजगृहात काही भाडेकरू आणि त्यांचे वारस राहत असल्याने आंबेडकर परिवाराशी चर्चा करून राजगृहाच्या राष्ट्रीय स्मारकाच्या संकल्पनेबाबत विचारविनिमय करावा, असे त्यांनी सांगितले.