रोहित पठारे कुटुंबीयांची रामदास आठवलेंकडून भेट आरोपींवर कठोर कारवाईसह मोक्का लावण्याची मागणी

रोहित पठारे कुटुंबीयांची रामदास आठवलेंकडून भेट आरोपींवर कठोर कारवाईसह मोक्का लावण्याची मागणी

मुंबई, दि. २३ : वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरणाची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वैजापूर येथे जाऊन पठारे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच काही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक तरतुदींनुसार ८ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार साडेचार लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. तसेच रोहित पठारे यांच्या पत्नीला शासकीय नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले. त्यांच्या भावालाही नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याशी चर्चा करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पठारे कुटुंबीयांनी अविश्वास व्यक्त केला असून, स्थानिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे रोहित यांचा जीव गेला असता, असा आरोप केला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना तपासातून दूर ठेवून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.

या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून आतापर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी आठवले यांना दिली.