लाडकी बहीण योजनेसाठी एससी, एसटी निधी वळवल्याचा आरोप; राजेंद्र पातोडेंचा सरकारला इशारा
अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला निधी वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. आतापर्यंत सुमारे ४ हजार ६०१ कोटी रुपयांचा निधी या योजनेकडे वळविण्यात आल्याचा दावा करत हा निधी तातडीने मूळ विभागांकडे परत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
अनुसूचित जाती आणि जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक विकासासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली जाते. मात्र, या घटकांसाठी राखीव निधी अन्य योजनांसाठी वापरणे हा संबंधित समाजाच्या हक्कांवर अन्याय असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगनेही आक्षेप नोंदविल्याचा दावा त्यांनी केला. निर्धारित तरतुदीपेक्षा ३ हजार ५४१ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा मुद्दा कॅगच्या अहवालात उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत काढण्यात आलेला सुमारे १५ हजार ५८६ कोटी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांना वितरित न करता व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, योजनेच्या लाभार्थी पडताळणी प्रक्रियेतील त्रुटींमुळे काही पुरुषांच्या खात्यावरही निधी जमा झाल्याचा दावा पातोडे यांनी केला. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, आर्थिक नियोजन आणि लाभार्थी निवडीबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पातोडे यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल आणि मे २०२५ दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून ४१० कोटी ३० लाख रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये ३४४ कोटी ३० लाख रुपये, सप्टेंबर आणि ऑक्टोबरदरम्यान ४१० कोटी ३० लाख रुपये तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वळविण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.
मे आणि जून २०२६ मध्ये ३४४ कोटी ७४ लाख रुपये तसेच ऑगस्ट २०२६ मध्ये आणखी ३४४ कोटी ७४ लाख रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व निधीचा तपशील सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असलेला निधी वापरणे योग्य नाही. अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी त्याच समाजाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे, अशी भूमिका पातोडे यांनी मांडली.
सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींचा निधी तातडीने संबंधित विभागांकडे परत केला नाही, तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानांवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. निधी वळविण्याच्या निर्णयामागील प्रक्रिया आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती सरकारने जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माजी आमदार नतिकउद्दीन खतीब, अशोक सोनोने, अरुंधती शिरसाट, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.