विधान परिषदेसाठी वंचितचे चार उमेदवार जाहीर
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून मंगेश छत्रपती वानखेडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे, पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. आय. सी. शेख, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून गाजी जाहोरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याच्या उद्देशाने हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी, पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी, शैक्षणिक क्षेत्रातील पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयांवर पक्षाची भूमिका मांडली जाणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.