स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावर भर
पुणे, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सच्या वतीने पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. यावेळी परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, पदसंख्या, उत्तरतालिका, परीक्षा केंद्रे आणि तक्रार निवारणाबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. टास्क फोर्सकडे आतापर्यंत राज्यभरातून १८ हजारांहून अधिक ईमेल प्राप्त झाले आहेत. परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, तसेच कार्यपद्धतीत वारंवार बदल न करता स्थैर्य द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. विविध संवर्गांसाठी किमान पदसंख्या आधीच जाहीर करण्याची सूचनाही करण्यात आली.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून छपाई, वाहतूक आणि वितरणापर्यंतची प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा समितीचा मानस आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीलाही ती कोणत्या परीक्षेसाठी आहे, याची माहिती नसावी, अशा पद्धतीच्या ई प्रश्नसंचाचा विचार करण्यात येत आहे. परीक्षाप्रक्रियेत प्रश्नपत्रिका गळती रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे समितीने स्पष्ट केले.
प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि उत्तरतालिकेतील चुका टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण अधिक काटेकोर करण्याची मागणी करण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीसाठी समान निकष निश्चित करावेत आणि परीक्षकांच्या गुणवत्तेची पडताळणी करावी, अशी सूचनाही विद्यार्थ्यांनी केली.
उमेदवारांच्या तक्रारी आणि हरकतींसाठी केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टल सुरू करावे, तसेच परीक्षा केंद्रांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि योग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सर्व परीक्षांसाठी एकदाच नोंदणी आणि शुल्क भरण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही मांडण्यात आली.
एकाच उमेदवाराला अनेक पदांसाठी पात्रता मिळाल्यास पदनिवड आणि ऑप्टिंग आऊट प्रक्रियेबाबत स्पष्ट धोरण असावे, अशी मागणी करण्यात आली. दिव्यांग आणि क्रीडा प्रवर्गातील प्रमाणपत्रांची योग्य टप्प्यावर पडताळणी करण्याची सूचनाही देण्यात आली.
पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा न घेता ओएमआर पद्धतीनेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले. या कालावधीनंतर ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्यात येईल. ओएमआर परीक्षांसाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील विविध लोकसेवा आयोगांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यात येत असून, तमिळनाडू, गुजरात आणि संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भागधारकांकडून मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून परीक्षा प्रक्रिया अधिक विश्वासार्ह केली जाईल, असे राधा यांनी सांगितले.
एमपीएससीवरील वाढती जबाबदारी लक्षात घेता आयोगाचे मनुष्यबळ, तांत्रिक क्षमता आणि संस्थात्मक रचना बळकट करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. अधिक गतिमान, पारदर्शक आणि उत्तरदायी अधिकारी निवड प्रक्रिया निर्माण करणे हे टास्क फोर्सचे उद्दिष्ट असल्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.