हिंगोलीतील फटाका दुर्घटनेची सखोल चौकशी करा
हिंगोली, दि. ६ : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेल्या आगीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे सांगत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या.
जखमींना तातडीने आवश्यक ते सर्वोत्तम उपचार मिळावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. तसेच फटाक्यांची साठवणूक, आवश्यक परवानग्या आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन याबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातील सर्व फटाका विक्री आणि साठवणूक केंद्रांची तातडीने तपासणी करून सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.