हिंगोलीतील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना अग्रिम मदत

हिंगोलीतील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना अग्रिम मदत

हिंगोली, दि. २० नोव्हेंबर : खरीप हंगाम २०२६ मध्ये झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या पाच तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ३५७ पात्र खातेदारांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मदत जमा करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांची माहिती तहसील स्तरावरून डीबीटी पोर्टलवरील संगणकीय प्रणालीद्वारे तपासण्यात आली. त्यानंतर पात्र खातेदारांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याची कार्यवाही तहसील स्तरावर सुरू आहे. संयुक्त खातेदारांच्या प्रकरणांमध्ये सर्व सहधारकांची शहानिशा करून संमती घेणे, मयत खातेदारांच्या वारसांची निश्चिती करणे आणि संबंधित वारसांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्र खातेदारांचीही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

आवश्यक पडताळणी आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही पाच हजार रुपयांची अग्रिम मदत डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी आणि संमतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसील स्तरावरील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.