हिंगोलीतील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य अभियानाला वेग

हिंगोलीतील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य अभियानाला वेग
हिंगोलीतील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य अभियानाला वेग
हिंगोलीतील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य अभियानाला वेग
हिंगोलीतील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य अभियानाला वेग

हिंगोली, दि. २४ : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आरोग्य चळवळ गतिमान करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभागृहात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान व्यापक लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्याच्या सूचना गायकवाड यांनी दिल्या. सामूहिक प्रयत्नातून हिंगोली जिल्ह्यातील एखाद्या गावाला राज्यस्तरावर पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागाने कटिबद्ध राहावे, असे त्यांनी सांगितले. गाव निरोगी झाल्यास जिल्हा आणि पर्यायाने राज्य निरोगी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अभियानाचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना त्यांच्या घराजवळ सर्वसमावेशक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. आरोग्याला ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आणण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाशी संबंधित पूर्वतयारी आणि नियोजित कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य विभागातील अधिकारी, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतींचे सरपंच यांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे गायकवाड यांनी सांगितले.

प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी ग्रामपंचायतींचे गुणांकन, मूल्यमापनाचे निकष आणि विजेत्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी अभियानाची रूपरेषा मांडली.

राज्यस्तरीय प्रशिक्षक स्नेहा गवई आणि प्रीती बगमारे यांनी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी वर्तन बदल संवादाचे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी भगवान धन्वंतरी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी केले. आभार जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.