ISRO आणि DRDO मधील खासगी सहभागावर प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था यांसारख्या देशाच्या सुरक्षेच्या आणि तांत्रिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या संस्थांबाबत केंद्र सरकारच्या धोरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ISRO आणि DRDO मध्ये खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग देशाच्या हितासाठी कितपत योग्य आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सरकारी संस्थांची भूमिका कायम मजबूत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना आंबेडकर यांनी सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आणि मोठ्या उद्योगसमूहांच्या हिताला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. ISRO आणि DRDO सारख्या राष्ट्रीय संस्थांना तरी या धोरणापासून दूर ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
निवडणूक निधीच्या मुद्द्यावरूनही आंबेडकर यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. निवडणुकांसाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर निधी घेतला जातो आणि त्याची किंमत देशाच्या सार्वजनिक मालमत्तेवर किंवा राष्ट्रीय संस्थांवर निर्णय घेऊन चुकवली जाणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
DRDO कडील काही संरक्षण तंत्रज्ञानाचे खासगी कंपन्यांना हस्तांतरण आणि ISRO च्या रॉकेट निर्मितीमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची ही भूमिका समोर आली आहे.
अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणूक व सहभाग वाढवताना राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञानाची गोपनीयता आणि देशाचे स्वावलंबन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे.