मुंबई - १ जून:
"शुभास्ते पंथानः संतु" या संस्कृत वाक्यप्रचाराचा अर्थ आहे – तुझा मार्ग शुभ असो. हाच शुभमार्ग घेत श्री. विनोद विश्वकर्मा यांनी किडनी ट्रान्सप्लांटनंतरही सदैव सक्रिय आयुष्य जगण्याचा संदेश देशभर पोहोचवला आहे.
विनोद विश्वकर्मा हे मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही केवळ सामान्य जीवन जगत नाहीत, तर त्यांनी आपल्या छंदातून – बाईक रायडिंगद्वारे – समाजाला प्रेरणादायी उदाहरण दिले आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०१० रोजी त्यांचा किडनी ट्रान्सप्लांट झाला. त्यानंतर त्यांनी शिर्डी, अजिंठा-एलोरा, भीमाशंकर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, आणि अष्टविनायक अशा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांना मोटारसायकलवरून भेट दिली आहे – तीही पाचहून अधिक वेळा!
फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी आणखी एक प्रेरणादायी प्रवास सुरू केला – मुंबई ते काठमांडू मोटारसायकल मोहीम. अंधेरी, मुंबई येथील नर्मदा किडनी फाउंडेशनच्या कार्यालयातून त्यांची झेंडा दाखवून रवानगी झाली. एकूण सुमारे ४५०० किमी चा प्रवास करत त्यांनी रस्त्यात किडनी आजार आणि अवयवदान याविषयी जनजागृती केली.
श्री. विश्वकर्मा हे किडनी प्रत्यारोपणानंतरही सामान्य आयुष्य जगता येते, स्वप्न पूर्ण करता येतात आणि सक्रिय राहता येते याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रवासात "स्वप्न, समर्पण आणि सेवा" या तीन तत्त्वांचा साक्षात्कार होतो.