पनवेल महापालिकेच्यावतीने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती नियोजन बैठक संपन्न

पनवेल,दि.3 : बकरी ईद सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सण शांततेत संपन्न होण्याकरिता नियोजन करण्याच्या हेतूने आज महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकिस पोलिस उपायुक्त अशोक राजपुत, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, पनवेल शहर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे ,तळोजाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खारघर दिपक सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खांदेश्वर स्मिता ढाकणे, चारही प्रभागाचे प्रभारी अधिक्षक, चारही प्रभागातील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिनांक 7 जून रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे .सदर सणानिमित्त मुस्लीम बांधवाकडून कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी देणेकामी तात्पुरते कत्तलखाने उभारणेकरिता परवानगी घेणे आवश्यक असते. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बकरी ईद करीता कुर्बानी साठी काही अटी व शर्तीस अधिन राहुन तात्पुरता कत्तलखाना उभारण्यास परवानगी देण्यात येते. यासाठी प्रभाग समिती निहाय, प्रभाग अधिकारी यांना सदर परवानगी देणेकामी प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
चारही प्रभागांमध्ये ज्या ठिकाणांना परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणीच बकऱ्यांची कत्तल केली जावी , ही ठिकाणे बंधिस्त असावीत, विविध सूचना या बैठकित देण्यातआल्या. तसेच महापालिकेकडून पाण्याची सोय व स्वच्छता विभागाने वाहनांची सोय करण्याबाबत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी मागणी केली.
आयुक्तांनी या मागण्या मान्य करून हा सण शांततेत ,उत्साहात संपन्न होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका व पोलिस विभागाच्यावतीने करण्यात आले. तर परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी सर्व उपस्थित त्यांचे आभार मानले.
......