सह्याद्रीचा आदिवासी वाघ राघोजी भांगरे यांचा इतिहास प्रेरणादायी

सह्याद्रीचा आदिवासी वाघ राघोजी भांगरे यांचा इतिहास प्रेरणादायी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आदिवासी क्रांतिकारक राघोजी रामजी भांगरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष उभारून इंग्रजांना आव्हान दिले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे राघोजी भांगरे हे महान क्रांतिकारक होते, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी केले.

राघोजी भांगरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे महादेव कोळी आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी भांगरे हे शूर योद्धे आणि किल्लेदार होते. वडिलांकडूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. ब्रिटिशांनी आदिवासी समाजाचे पारंपरिक हक्क हिरावून घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात संघर्ष सुरू केला.

१८२१ मध्ये रतनगडावर झालेल्या बंडात राघोजी भांगरे वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांसोबत सहभागी झाले होते. पुढे त्यांनी आपले बंधू बापूजी भांगरे आणि सहकाऱ्यांच्या मदतीने महादेव कोळी व भिल्ल तरुणांना संघटित केले. १८३८ मध्ये रतनगड आणि परिसरात ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव केला. सह्याद्रीच्या भौगोलिक परिस्थितीची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी ब्रिटिश फौजांना मोठे आव्हान दिले.

ब्रिटिश राजवटीत शेतसारा वाढविणे, सावकारांकडून शेतकऱ्यांचे शोषण आणि आदिवासींच्या जमिनी बळकावणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होते. या अन्यायाविरोधात राघोजी भांगरे यांनी लढा उभारला. अकोले, जुन्नर, नाशिक, ठाणे, पुणे आणि सातारा परिसरात त्यांनी ब्रिटिश अधिकारी व जुलमी सावकारांविरोधात संघर्ष केला. सावकारांच्या शोषणातून आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

१८४४ ते १८४५ या काळात त्यांचा उठाव अधिक तीव्र झाला. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि नाशिक परिसरात त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. महादेव कोळी समाजासोबत भिल्ल समाजालाही एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आदिवासी समाजात ऐक्य निर्माण करून अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

ब्रिटिश सरकारने राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. अखेर १८४८ मध्ये पंढरपूर येथे त्यांना अटक करण्यात आली. ठाणे येथील न्यायालयात त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. २ मे १८४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. शहापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे त्यांची समाधी आहे.

राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात दिलेला लढा, आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी केलेले कार्य आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे, असे महान कार्य त्यांनी केल