इचलकरंजी महापालिकेत माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळा
इचलकरंजी : माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेच्या सभागृहात सोमवारी २८ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेत माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना माहिती उपलब्ध करून देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी तसेच अभिलेखांचे जतन आणि व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. माहिती अधिकार हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील पारदर्शकता वाढविणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती अधिकार अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करून विहित कालावधीत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींची योग्य माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करून घ्यावी तसेच नागरिकांना आवश्यक माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यशाळेस सहायक संचालक नगररचना विजय फुलपगारे, सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, सहायक नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, उद्यान पर्यवेक्षक प्रशांत आरगे, संगणक विभाग प्रमुख अजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, जनमाहिती अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.