खारघरमध्ये महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

खारघरमध्ये महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
खारघरमध्ये महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल, दि. ११ सप्टेंबर : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर २१ येथे उभारण्यात आलेल्या शिवनेरी महापौर निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नेते आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते १० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या वास्तूमुळे पनवेल शहराच्या वैभवात भर पडली आहे.

या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, योगेश सागर, महेश बालदी, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद रायगडचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेने गेल्या दहा वर्षांत विविध विकासकामे आणि प्रकल्प साकारल्याचे सांगितले. खारघरमध्ये भव्य महापौर निवासस्थान उभारले जाणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पनवेलच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

महापौर नितीन पाटील यांनी महापौर निवासस्थानाच्या लोकार्पणाबद्दल समाधान व्यक्त केले. पनवेल महानगरपालिका भविष्यात एमएमआर क्षेत्रातील मुंबईनंतरची सर्वात मोठी महापालिका म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्टेशन आणि समृद्धी महामार्गाचे जंक्शन यामुळे पनवेल परिसराचा वेगाने विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवनेरी महापौर निवासस्थान खारघर सेक्टर २१ मधील भूखंड क्रमांक १५१ आणि १५१ अ अशा एकूण २५७२.८१ चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात आले आहे. या वास्तूचे मुख्य बांधकाम क्षेत्रफळ १४०५.२८ चौ.मी. आहे. निवासस्थानात सहा बेडरूम्स, प्रशस्त लिव्हिंग रूम, दोन सिटआऊट, सुसज्ज स्वयंपाकघर आणि महापौर कार्यालयासाठी स्वतंत्र जागा आहे. तसेच अत्याधुनिक जिम, बेसमेंट पार्किंग, लिफ्ट आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

कार्यक्रमात महापौर निवासस्थानाच्या वास्तुरचनेत योगदान देणारे वास्तुविशारद, कंत्राटदार तसेच वास्तुविशारद आणि नगरसेविका रुचिता लोंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, स्वरूप खारगे, अभिषेक पराडकर, सहायक आयुक्त डॉ. रुपाली माने, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.