पनवेलमध्ये पिल्लई विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

पनवेलमध्ये पिल्लई विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
पनवेलमध्ये पिल्लई विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

पनवेल, दि. ९ सप्टेंबर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा तसेच शाडू मातीच्या मूर्तींचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय फायदे, मूर्ती विसर्जनामुळे होणारे परिणाम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार केल्या.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन वडेर, पिल्लई विद्यार्थी जीवन अधिष्ठाता प्रा. दिपीका शर्मा, पिल्लई स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनचे अधिष्ठाता मंदार धुरी, कम्युनिटी एंगेजमेंट अँड आउटरीच संचालक डॉ. शबाब रिझवी तसेच प्रा. जयेश पाटील, प्रा. अर्चना इंगोले आणि प्रा. मंगेश उपस्थित होते.

गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव असून त्यासोबत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. पुढील पिढ्यांना स्वच्छ आणि समृद्ध पर्यावरण देण्यासाठी घरातील मुलांच्या सहभागातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यशाळेच्या शेवटी उपस्थितांनी माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले.