भिवंडीत रोजगार महाकुंभातून 146 उमेदवारांना नोकरी

भिवंडीत रोजगार महाकुंभातून 146 उमेदवारांना नोकरी
भिवंडीत रोजगार महाकुंभातून 146 उमेदवारांना नोकरी
भिवंडीत रोजगार महाकुंभातून 146 उमेदवारांना नोकरी

भिवंडी : महाराष्ट्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ कार्यक्रमांतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे शहरातील तीन ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 146 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

ईदगाह येथील तकिया अमानी शाह आयटीआय, कामतघर फेणेपाडा येथील तेलगू समाज शिक्षण संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील चाचा नेहरू शाळेतील संस्कार प्रतिष्ठान येथे हा मेळावा पार पडला.

मेळाव्यासाठी 600 उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी 379 उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. चाचा नेहरू शाळेतील संस्कार प्रतिष्ठान येथे उपस्थित 213 उमेदवारांपैकी 178 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. त्यापैकी 118 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर तकिया अमानी शाह आयटीआय येथे उपस्थित 127 उमेदवारांपैकी 28 जणांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 146 उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली.

या रोजगार मेळाव्यात 32 कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये दोढिया लि., ट्रायडेंट एचआर प्रा. लि., प्रिकोन मॅनपॉवर, श्री कृपा सर्व्हिस प्रा. लि., एलआयसी, महिंद्रा अँड महिंद्रा, फ्लिपकार्ट, टोरंट पॉवर आणि हिताची कॅश मॅनेजमेंट यांसह विविध कंपन्यांचा समावेश होता.

यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रमुख मिलिंद पळसुले, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्रमांक 5 गिरीष घोष्टेकर, कौशल्य विकास विभागाचे व्ही. आर. पाटील यांच्यासह संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी सभापती प्रभाग समिती क्रमांक 5 ॲड. वैभव भोईर, नगरसेवक सुमीत पाटील, नगरसेवक निलेश चौधरी, माजी नगरसेवक हनुमान चौधरी, नगरसेविका रोमा आळशी, नगरसेविका नेहा काठवले आणि प्रमुख मार्गदर्शक ॲड. हर्षल पाटील उपस्थित होते.