वाशीत ८ ऑक्टोबरपासून ‘बॉइलर इंडिया २०२६’चे आयोजन
ठाणे, दि. ७ : उद्योग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बॉइलर इंडिया २०२६’चे आयोजन ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग आणि बाष्पके संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असतील.
बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर, हिट एक्सचेंजर्स, प्रेशर वेसल्स निर्मितीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावर प्रदर्शनात विशेष भर देण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या आणि तज्ज्ञ या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
तीन दिवसांच्या कालावधीत विविध तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर प्लांट्स, बायोमास व वेस्ट फ्यूल्सद्वारे डिकार्बनायझेशन आणि उच्च कार्यक्षम सीएफबीसी बॉइलर तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
९ ऑक्टोबर रोजी एआय आधारित प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, ॲग्रो वेस्ट ऊर्जा निर्मिती, बायोमास ऊर्जा, वॉटर केमिस्ट्री व्यवस्थापन आणि वेस्ट टू एनर्जी तंत्रज्ञानावर चर्चा होईल. तर १० ऑक्टोबर रोजी नवीन बॉइलर ॲक्ट २०२५ व नियम, अपघात विश्लेषण, सुरक्षा आणि ऊर्जा बचतीसंदर्भात चर्चासत्रे होणार आहेत. यावेळी उत्कृष्ट बॉइलर वापरकर्त्यांना बेस्ट बॉइलर युझर अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे.
बाष्पके क्षेत्रातील हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन उद्योग क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरेल. उद्योगपती, अभियंते, तंत्रज्ञ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे प्रभारी संचालक संदीप चिवटे यांनी केले आहे.