कामोठ्यात अनधिकृत व्यावसायिकांवर पालिकेची धडक कारवाई
पनवेल, दि. ७ : कामोठे परिसरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. अनधिकृत हातगाड्या, फळे भाजी विक्रेते, टपऱ्या आणि फुटपाथवरील व्यवसायांवर कारवाई करण्यात आली.
दुकानांच्या बाहेरील तसेच रस्त्यालगतच्या जागेवर अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. मुख्य रस्ते, शाळांचा परिसर आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, प्रभागांचे अधीक्षक, अतिक्रमण विभाग प्रमुख अमर पाटील आणि विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.