समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन

समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन

संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम

पुणे : लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड  करण्यात आली असून हे संमेलन २८ जून २०२६ रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

यावेळी धनंजय खुडे, विलास लांडगे, विजय मोरे, सुनील खंडाळे, रेश्मा मुसळे-परीतेकर, विकास माने, बाळासाहेब मालुसकर, जितेंद्र वाईकर, उपस्थित होते.  समरसता लोककला संमेलन २०२६ चे  उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार,  राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर  मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष  भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत.

या संमेलनात  सकाळी 8 वाजता पुणे महानगरपालिका ते बालगंधर्व रंगमंदिर अशी लोककलावंतांची भव्य लोककला दिंडी निघणार आहे, त्यांचे उद्घाटन महापौर मंजूषा नांगपुरे यांच्या हस्ते होईल,  या दिंडीत गोंधळी, वासुदेव, शाहिर, भारूड, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, झाडीपटी यांसारख्या सुमारे २५० लोककलावंतांचा सहभाग असणार आहे.दुर्मीळ लोकवाद्यांचे प्रदर्शन  बालगंधर्व रंगमंदिर, कला दालन  येथे असणार आहे त्यांचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. 

उद्घाटन सोहळ्या नंतर दुपारी 12 वाजता  विशेष मुलाखत सत्रात पद्मश्री रघुवीर खेडेकर आणि  लोककलावंत नंदेश उमप यांची मुलाखत  अभिनेते संदीप पाठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता कवी संमेलनात तुकाराम ढोले, प्रा. वा. ना. आंधळे आणि कुमार चव्हाण हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता आयोजित चर्चासत्रात डॉ. प्रवीण चोले, डॉ. प्रशांत पाटील आणि अभिनेत्री जायमाल इनामदार  सहभागी होणार आहेत.

संमेलनाचा समारोप मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपुरचे  कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यानंतर लोककला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.