सहकारातून आंबेडकरी तरुणांनी आर्थिक सक्षम व्हावे
लंडन, दि. २१ : आंबेडकरी तरुणांनी शिक्षणासोबतच उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही पुढे यावे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक बळकटी निर्माण करण्यासाठी सहकारी संस्था उभारण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लंडन येथे आयोजित आंबेडकरी बौद्ध उद्योजकांच्या बिझनेस समिटमध्ये आठवले बोलत होते. यावेळी पद्मश्री कल्पना सरोज, आयोजक शिरीष रामटेके, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, चंद्रशेखर कांबळे यांच्यासह लंडनमधील आंबेडकरी कार्यकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील बौद्ध तरुण उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी शिक्षण आणि उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाय आणि सहकार क्षेत्रातही सक्रिय सहभाग वाढविण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रात आंबेडकरी तरुणांचा सहभाग तुलनेने कमी असून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी आर्थिक व्यवस्था उभी करता येऊ शकते, असे आठवले यांनी सांगितले.
सहकार भांडाराच्या धर्तीवर डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि अन्य व्यवसाय सहकारी तत्त्वावर उभारण्याचा विचार तरुणांनी करावा. सहकारी चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.