“ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं” — आयपीएस डॉ. महेश भागवत
पीसीसीओईमध्ये विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद
पिंपरी, पुणे (दि. २४ एप्रिल २०२६): स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चालू घडामोडींचे ज्ञान अत्यावश्यक असून, त्यासाठी दररोज नियमितपणे वृत्तपत्र वाचन करण्याची सवय लावावी, असे प्रतिपादन तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांनी केले. “ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं” असे ठाम मत व्यक्त करत, त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनही सातत्याने सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE) येथे आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भागवत यांनी पुढे सांगितले की, नागरिकांच्या पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा असतात; मात्र पोलीस यंत्रणेवर कामाचा मोठा ताणही आहे. सध्या एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे २५ टक्के गुन्हे सायबर क्राईमशी संबंधित असून, याबाबत नागरिकांमध्ये जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. परिसरातील जागरूक नागरिकांनी ‘पोलिस मित्र’ म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, डॉ. महेश भागवत यांनी १९९५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण करून देशसेवेसाठी प्रवेश केला. नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, मानवी तस्करीविरोधी कार्य, बालमजुरांची सुटका व त्यांच्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे, तसेच सायबर गुन्ह्यांचा प्रभावी तपास अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन माधुरी ढमाले यांनी केले. समारोप सत्रात डॉ. भागवत यांनी पीसीईटीच्या ‘इन्फिनिटी’ कम्युनिटी रेडिओला भेट देऊन श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला.