आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला जाब विचारू

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला जाब विचारू

सुजात आंबेडकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची घेतली भेट

पुणे : आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी इतरत्र वळवण्याचा, त्यांच्या मागण्या दाबण्याचा किंवा त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिला.

पुण्यातील मांजरी भागातील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला भेट देत सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये चांगल्या दर्जाची मेस सुविधा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. तसेच गडचिरोली येथे वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर यांनी बोगस आणि बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून आदिवासी कोट्यात घुसखोरी करणाऱ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत, अशी मागणी केली. आदिवासींचे आरक्षण केवळ मूळ आदिवासींनाच मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका सरकारकडून घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित शासन निर्णयाचा निषेध केला. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील सर्व आदिवासी वसतिगृहांमध्ये स्वच्छता, दर्जेदार भोजन, झोपण्यासाठी कॉट आणि बेड तसेच पुरेशी स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. या सर्व वसतिगृहांचे तातडीने ऑडिट करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिक कुंभमेळा आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेला निधी मोठ्या प्रमाणावर इतरत्र वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एससी आणि एसटी निधीच्या वापराचे ऑडिट जाहीर करावे तसेच भविष्यात हा निधी इतरत्र वळवला जाऊ नये यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सुजात आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.