नवीन 108 रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत दाखल होणाऱ्या नवीन 108 रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या रुग्णवाहिका लवकरात लवकर शासकीय सेवेत दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यात 108 रुग्णवाहिका सेवेंतर्गत एकूण 1756 रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जीवनरक्षक सेवा देणाऱ्या ALS आणि मूलभूत जीवनरक्षक सुविधांच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. तसेच नवजात बालकांसाठी 36 रुग्णवाहिका, 166 दुचाकी रुग्णवाहिका, 15 नदी बोट रुग्णवाहिका आणि 10 समुद्री बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
या रुग्णवाहिकांमध्ये ECG, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्षन पंप आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेतून रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णवाहिकांची पाहणी करून सुविधांची माहिती घेतली तसेच आवश्यक बदलांबाबत सूचना केल्या.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.