पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती द्या; निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती द्या; निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे 

सोलापूर,  — संपर्कप्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीला स्थगिती देऊन पक्ष वाचवावा, अशी मागणी प्रा. अजय दासरी यांनी केली आहे.या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत हालचालींमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. २१ जानेवारी २०२६ रोजी सुषमाताई अंधारे यांच्या नियुक्तीबाबत विरोधाभासी माहिती समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर २५ जानेवारी रोजी सोलापुरात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीतील पराभवाची कारणे मांडण्यात आली होती. तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी वाढल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

२४ फेब्रुवारी रोजी आयोजित दौऱ्यात ११ विधानसभा व ११ तालुक्यांचा आढावा एका दिवसात घेण्यात आल्याने हा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची टीका करण्यात आली. ग्रामीण भागात स्वतंत्र बैठका न घेता शहरापुरत्याच बैठकांना मर्यादा घालण्यात आल्याने ग्रामीण कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना व्यक्त झाली.

पदनियुक्ती प्रक्रियेत मुलाखत पद्धतीचा अवलंब करण्यात आल्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या या प्रक्रियेबाबत अनेक कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या पारंपरिक कार्यपद्धतीत अशा प्रकारची पद्धत नसल्याचे सांगत या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला.

१७ मार्च व ७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काही वादग्रस्त व्यक्तींना संधी देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये अलीकडील नियुक्त्यांचा पुनर्विचार करणे, प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पारदर्शक पद्धतीने निर्णय घेणे आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण वस्तुस्थिती पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्यापर्यंत पोहोचवून योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, योग्य निर्णय न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्याचा इशाराही देण्यात आला. पत्रकार परिषदेत नव्या नियुक्त्या व त्यावरील आक्षेप यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस दादासाहेब पवार (मोहोळ), देवा दिंडोरे (बार्शी), शिवाजी नील (उत्तर सोलापूर), रवी घंटे (दक्षिण सोलापूर), शशिकांत बिराजदार, आनंदकुमार थोरात, नाना मोरे, पद्माताई म्हंता, रवी म्हेत्रे, सुमित भांडेकर, अजय बादगुडे, सोमनाथ तोडकरी, अथर्व सुपाते, दत्ता रुचनभैरे, जगदीश कलकरी, अमित भांडेकर, सुरेश शिंदे, इब्राहिम पिरजादे, युवराज बादगुडे पाटील, राजू क्षीरसागर, रमेश शिखरे, अशोक बोकेवाले, महानंदा बनसोडे आदींसह जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते