पनवेलमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष धूर फवारणी मोहीम

पनवेलमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष धूर फवारणी मोहीम
पनवेलमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष धूर फवारणी मोहीम

पनवेल, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पावसाळ्यानंतर डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देत विशेष धूर फवारणी आणि सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे.

महापालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पाहणी केली जात आहे. साचलेले पाणी नष्ट करणे, आवश्यक ठिकाणी अळीनाशक औषधांची फवारणी करणे तसेच ज्या ठिकाणी पाणीसाठे रिकामे करणे शक्य नाही, तेथे गप्पी मासे सोडणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.

तुर्भे, रोहिंजण, देवीचा पाडा, पडघे, नावडे, तोंडरे, पिसार्वे आणि आवे कॅम्प परिसरात विशेष धूर फवारणी मोहीम राबविण्यात आली आहे. यासोबतच नागरिकांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृती करण्यात येत असून माहितीपत्रकांचे वितरणही करण्यात आले आहे.

संशयित तापाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी तातडीने रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरातील पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद यांची नियमित स्वच्छता करून त्यामध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे तसेच भंगार, फुटके डबे, टायर आणि इतर वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेसोबत नागरिकांनीही स्वच्छता आणि पाणी साठवणुकीबाबत आवश्यक काळजी घेतल्यास कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.