पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भिवंडी, दि. २ : यंदा दिवाळीचा सण पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. वाढते वायुप्रदूषण आणि मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने फटाक्यांच्या विक्रीसह सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑक्टोबर रोजी पर्यावरण विभाग, परवाना विभाग, प्रभाग अधिकारी, अग्निशमन विभाग, पोलीस विभाग आणि फटाके विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत फटाके विक्रीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागा आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

फटाक्यांची दुकाने सुरू करण्यापूर्वी परवाना विभाग, अग्निशमन विभाग आणि पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक दुकानाबाहेर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. उच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबर रोजी दिलेले आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असल्याने फटाके विक्रेत्यांनीही न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले.

शांतता क्षेत्रात फटाके वाजवू नयेत, तसेच यंदा कमी आवाजाचे आणि कमी धूर निर्माण करणारे फटाके वापरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीबाबत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.

या बैठकीला उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर, परवाना विभागप्रमुख स्नेहल पुण्यार्थी, पोलीस विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि फटाके विक्रेते उपस्थित होते.