विद्यार्थ्यांना जर्मनी-जपानमध्ये रोजगाराच्या संधी; राज्य तंत्रशिक्षण मंडळ–CII सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना जर्मनी-जपानमध्ये रोजगाराच्या संधी; राज्य तंत्रशिक्षण मंडळ–CII सामंजस्य करार

मुंबई, दि. २२ : विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडला.

विद्यार्थ्यांना परदेशात रोजगार मिळवण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान आवश्यक असल्याचे सांगत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये, आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढणार असून, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले.

या सामंजस्य करारानुसार, CII त्यांच्या कौशल्य उत्कृष्टता केंद्रामार्फत “महाराष्ट्र–जर्मनी–जपान कुशल कामगार गतिशीलता” या उपक्रमासाठी अंमलबजावणी व उद्योग समन्वय भागीदार म्हणून कार्य करणार आहे. या कराराचा मुख्य भर प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य समन्वयावर राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून या उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा—वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि नेटवर्किंग सुविधा—उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, प्रशिक्षण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधला जाणार आहे.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, CII चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत एन., राज्य प्रमुख पुष्कर हाथे तसेच आंतरराष्ट्रीय भाषा विभागाचे प्रमुख नवोनील डी. आणि दयाल कांगणे उपस्थित होते.

हा करार राज्यातील तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.