हिंगोली जिल्हा परिषदेकडून आरोग्य, पाणीटंचाई आणि चारा नियोजनाचा आढावा

हिंगोली जिल्हा परिषदेकडून आरोग्य, पाणीटंचाई आणि चारा नियोजनाचा आढावा

हिंगोली, दि. २६ ऑक्टोबर : हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास योजनांचा आणि विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत किशोरवयीन मुला मुलीं.चे आरोग्य, संभाव्य पाणीटंचाई, चारा नियोजन, जलतारा उपक्रम आणि ग्रामपंचायतींच्या कामकाजातील पारदर्शकता या विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी कामांना गती देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गायकवाड यांनी दिले.

किशोरवयीन मुलांच्या आरोग्याला प्राधान्य

जिल्ह्यातील १० ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ओळखून हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. मुलींना वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन द्यावे, तसेच रक्तक्षय निर्मूलनासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करून सादर करावा, असे गायकवाड यांनी सांगितले.

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पीअर एज्युकेटर गटातील मुलांसाठीही विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य योजनांची अंमलबजावणी गतिमान करा

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा आढावा घेताना आयुष्मान भारत कार्ड आणि वय वंदना कार्ड वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

पाणीटंचाईचा आराखडा जून २०२७ पर्यंत तयार करा

आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले. पाणीटंचाईचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जून २०२७ पर्यंतचा सर्वसमावेशक आराखडा तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले.

जलतारा कामांना गती देण्याबरोबरच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा लागवडीचे काटेकोर नियोजन करून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात कुरण लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला.

ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता

ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या सभा आणि मंजूर ठरावांचे जिओ टॅग केलेले छायाचित्र ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी भगत, मंजुश्री कलेवाड, संदीप सोनटक्के, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र पुरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.