‘फाळणी – एक कहाणी’ नाट्यप्रयोगातून फाळणीच्या वेदनादायी आठवणींना उजाळा
पनवेल महानगरपालिकेतर्फे ‘फाळणी भयावहता स्मृतिदिनानिमित्त’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, दि. १३ ऑगस्ट : भारताच्या फाळणीच्या काळातील वेदनादायी घटना, त्याग, संघर्ष आणि असंख्य नागरिकांनी सोसलेल्या यातनांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘फाळणी – एक कहाणी’ या विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहे.
फाळणीच्या काळातील ऐतिहासिक प्रसंग नाट्यरूपातून सादर करताना त्या काळातील संघर्ष, दुःख आणि त्यागाच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत. तसेच या इतिहासातून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
‘फाळणी भयावहता स्मृतिदिन’ निमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.