जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

हिंगोली, दि. १ : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सुरळीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. पाणीपुरवठ्याच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत त्यांनी पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गणेश गांजरे उपस्थित होते.

हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव आणि कळमनुरी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि नवीन योजनांची स्थिती, पाण्याचे स्रोत, उपलब्ध साठवण क्षमता, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साठवण आणि वितरण व्यवस्थेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.

काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध असून पुरेशी साठवण क्षमता आहे, तेथे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी प्राधान्याने दूर कराव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्यासोबतच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी. नागरिकांना वेळेत आणि सुरळीत पाणी मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

हिंगोली शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या मागण्या आणि उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता यावा, यासाठी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.