मुंबईत विमुक्त भटके जनजाती विकास परिषदेचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

मुंबईत विमुक्त भटके जनजाती विकास परिषदेचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

मुंबई (मुंबई प्रतिनिधी सौ रूपाली बैसाने): विमुक्त, भटके व वंचित जाती-जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेच्या वतीने एकदिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील फुलपाखरू उद्यान, बोरिवली पूर्व येथे करण्यात आले होते. या अभ्यासवर्गाला केंद्रीय भटके-विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांची पूर्णवेळ उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेचे पूजन करण्यात आले. समूहगीतानंतर संघटनेचे राज्य कार्यवाह गिरीधर साळुंके यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थितांचा परिचय करून देण्यात आला.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोविंदराव गुंजाळकर यांनी महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त समाजासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तर राष्ट्रीय कार्यवाह अनिल देविदास फड यांनी संघटनेची स्थापनेपासूनची वाटचाल, इदाते समितीने केलेल्या शिफारशी आणि त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील सद्यस्थिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर मुक्त चर्चा व प्रश्नोत्तरांचे सत्र पार पडले. यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांच्या प्रश्नांना राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांनी उत्तरे दिली. समाजाच्या प्रश्नांवर काम करताना सातत्य राखणे आवश्यक असून, भविष्यात राज्यातील सर्व विभागांमध्ये अशा प्रकारचे अभ्यासवर्ग आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समारोपप्रसंगी पद्मश्री दादा इदाते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजही विमुक्त व भटक्या समाजासमोर अनेक समस्या आणि अडचणी आहेत. समाजासाठीचे हे कार्य निरंतर चालणारे असून, केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी तन-मन-धन अर्पण करून निःस्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते आणि हितचिंतक तयार करणे, हे या अभ्यासवर्गाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

हे एक ईश्वरीय कार्य असून दीन-दुबळ्यांची सेवा आहे. प्रत्येकाने आपापल्या परिसरात हे कार्य प्रामाणिकपणे पुढे न्यावे. आपण कामाला सुरुवात करा, जिथे अडचण येईल तिथे आपण सहकार्य करू, असा विश्वासही दादा इदाते यांनी उपस्थितांना दिला.

या अभ्यासवर्गाला महाराष्ट्रातील पदाधिकारी गोविंदराव गुंजाळकर, डॉ. दिलीप गरुड, विठ्ठल मारनार, डॉ. लक्ष्मण जाधव, तुषार पोपट, राहुल परदेशी, मुंबई अध्यक्ष सहदेव रसाळ, बबन मोहिते, मंगेश शिंगे, संतोष भांडे, सचिन कोंडे, संदेश कमलाकर कोलापटे आदींसह राज्यभरातून शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कार्यवाह गिरीधर साळुंके यांनी केले, तर मुंबई कार्यवाह निहारिका खोदले यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.