इचलकरंजीत नागरिकांसाठी मोफत देशी वृक्ष वाटप उपक्रम

इचलकरंजीत नागरिकांसाठी मोफत देशी वृक्ष वाटप उपक्रम
इचलकरंजीत नागरिकांसाठी मोफत देशी वृक्ष वाटप उपक्रम

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने नागरिकांसाठी मोफत देशी वृक्ष वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी या उपक्रमात नागरिकांसह विविध संस्था आणि आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी महापौर अनिलजी डाळ्या यांनी केले आहे.

महानगरपालिका हद्दीतील नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी आस्थापना, सामाजिक मंडळे, शाळा, महाविद्यालये आणि कारखाने आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी मोफत रोपे घेऊन जाऊ शकतात. शहीद भगतसिंग उद्यान येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत दररोज रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून रोपे संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

या उपक्रमात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, आंबा, जांभूळ, बकुळ आणि करंज यांसारख्या स्थानिक व देशी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांमुळे शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होण्याबरोबरच तापमान नियंत्रण, भूजल संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणास हातभार लागणार आहे. पशुपक्ष्यांना देखील या वृक्षांमुळे निवारा उपलब्ध होणार आहे.

नागरिकांनी केवळ रोपे घेऊन न जाता त्यांची योग्य पद्धतीने लागवड करून नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. इचलकरंजी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.